
जळगाव समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव : महाराष्ट्राच्या विकास आराखड्यातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाला आता जळगाव जिल्हा जोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या कामासाठी त्यांच्यासह खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा सुरू होता. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास जळगावच्या विकासाला वेग आणि आत्मविश्वासाची नवी दिशा मिळणे शक्य आहे. तथापि, या महामार्गावर जैवविविधता निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणाचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
सध्या जळगाव–मुंबई प्रवास हा धुळे–नाशिकमार्गे ८ तासांहून अधिक वेळ लागतो. जळगाव–छत्रपती संभाजीनगर–मुंबई मार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवास फक्त ५ तासांत पूर्ण होणार आहे. तसेच जळगाव जिल्हा समृध्द महामार्गाच्या नकाशावर देखील येवून जाईल. तसे झाल्यास जळगाव ते छत्रपती संभाजीनगर : १ तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगर ते मुंबई : ४ तास असे अंतर कमी होईल.
नागपूर बैठकीत काय ठरले
नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण आणि संबधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. तातडीने काम सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
या प्रकल्पामुळे काय फायदा होईल
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास जळगावचा व्यापार उद्योगवाढीस चालना मिळेल. कृषीपदार्थ, फळे-भाज्या वेळेत मुंबईला पोहचवता येतील.
उद्योग लॉजिस्टिक पार्क, स्मार्ट सिटीला चालना मिळून रोजगार वाढीला गती प्राप्त होईल.
या मार्गावर वेरूळ – अजिंठा सारखे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे पर्यटक आणि भाविकांची अधिक चांगली सोय होईल. वेळेची बचत होईल.
कमी वेळ, कमी इंधन, कमी प्रदूषण देखील होईल.
पर्यावरणाचे नुकसान आणि
समतोल साधण्याचे आव्हान
हा परिसर नैसर्गिक साधन, संपत्तीने नटलेला आहे. त्यामुळे महामार्ग बनताना जंगल, नद्या आणि पशू, पक्षी, प्राण्यांच्या अधिवासावर मोठा परिणाम होऊ शकतो. उपलब्ध जलस्रोत आणि पाणीपुरवठ्यावर ताण पडून त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

दीर्घकाळ चालणारे बांधकाम आणि वाढत्या वाहतुकीमुळे धूळ-वायू प्रदूषण होऊ शकतात. अर्थात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करून महामार्गाच्या कडेला झाडांची लागवड करण्याचे नियोजन करावे लागेल.
जलसंवर्धनासाठी संरक्षक कामे नियोजनपूर्वक करावे लागतील. जैवविविधता ही या भागाची खासियत आहे. त्याला कमीत, कमी धक्का कसा लागेल किवा लागणारच नाही, याचा परिपूर्ण अभ्यास आणि नियोजन करणे गरजेचे आहे. हा मार्ग केवळ जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडणी म्हणजे रस्त्याचा विस्तार नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे नवे दार असणार आहे. मात्र, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधला तरच हा प्रकल्प खरी समृद्धी घडवू शकेल.
