
हो
आज सत्ताधाऱ्यांची वागणूक अशी झालीआहे की सत्ता म्हणजे त्यांच्या बापाची जहागीर !

लोकशाही ही सर्वसामान्य जनतेला त्यांच्या अधिकारांची हमी देणारी व्यवस्था आहे. पण वास्तवात सत्तेवर बसणारे बरेच लोक हे लोकशाहीचे सेवक न राहता तिचे भांडवल करणारे झाले आहेत.
सत्तेत येणाऱ्यांचा दर्जा, बोलण्याची भाषा, विचार करण्याची पद्धत आणि लोकांप्रती असलेली जबाबदारी ही सर्वसामान्य जनतेची राजकिय नेत्याबद्दल भाबडी अपेक्षा असते. परंतु आजच्या राजकारणात नेत्यांचा दर्जा खालावत चालला आहे. विचित्र, वात्रट, भंपक बोलणारे, आचारविचार नसलेले, कमी शैक्षणिक पात्रतेचे, फक्त पैसा, लागेबांधे, घराणेशाही आणि लोकांच्या मजबुरीवर उभे राहिलेले लोक सत्तेत पोहोचतात. हे लोक सत्तेत आल्यावर जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी आणि आपल्या मंडळींसाठीच सत्ता वापरतात. याउलट, शालेय शिक्षणापासून ते देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेणारे, प्रामाणिकपणे काम करणारे नोकरदार वर्गाला या “अर्धशिक्षित” सत्ताधाऱ्यांच्या आदेशांचे पालन करावे लागते. कारण लोकशाही आहे. पण हीच लोकशाही सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी कारभारामुळे धुळीस मिळत चालली आहे.
आज सत्ताधाऱ्यांची वागणूक अशी झाली आहे की सत्ता म्हणजे त्यांच्या बापाची जहागीर. ते राजे आणि जनता गुलाम! राज्यातील जिल्हा-जिल्ह्यात दोन नंबरचे व्यवहार, गुंडगिरी, भ्रष्टाचार करणारे “बोके” उगवले आहेत. मंत्री किंवा नेते जिल्ह्यात आल्यावर त्यांचे स्वागत, कमानी, जाहिराती, बॅनर लावणारे यांची गर्दी जमली आहे. अर्थात, यामागे प्रेम नसून ‘आपला उल्लू साधण्याची’ स्वार्थी धडपड असते. त्यातूनच “आका” आणि “बोके” यांची अवैध सत्ता वाढत जाते.
अलीकडच्या घटनेत, प्रामाणिक महिला अधिकारी अंजनी कृष्णा यांना फोनवरून कारवाई करण्याची धमकी उपमुख्यमंत्री पातळीवरून येते, तेव्हा जनतेला उमगते की सत्ता नेमकी कोणासाठी वापरली जाते. हे केवळ चर्चेचे विषय राहत नाहीत, तर नेत्याचे अकलेचे दिवाळे निघाले असे ठरते. आणि असे असूनही, अशा माजोरड्या नेत्यांची बाजू मांडायला छोटे-आका, तळी उचलणारे, बांडगूळ पुढे येतात. कारण त्यांनाही स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवायची असते.
कधीकाळी भाजप हा शिस्तप्रिय, केडर बेस, प्रामाणिक लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. पण सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले लोक सोबत घ्यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला प्रामाणिक समजत असतील, पण ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करायचा आणि नंतर त्याच लोकांना सोबत घेऊन आरोप थांबवायचे, क्लिन चिट द्यायची, त्यांची वकिली करायची – हे काय? हाही तर मोठा नैतिक भ्रष्टाचारच आहे. अशा व्यवस्थेमुळे एका प्रामाणिक महिला अधिकाऱ्याला नक्कीच मानसिक त्रास झाला असेल. केरळ सारख्या शिक्षित राज्यात शिकलेल्या, एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंजनी ह्या 2022 मध्ये चांगल्या रॅंकने उत्तीर्ण झाल्या आहेत. आई शासकीय नोकरीत लिपिक आणि वडील किराणा दुकान चालवणारे आहेत. महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी आणि प्रगतीशील राज्याची त्यांनी निवड केली, आणि त्यांना एका बड्या राजकारण्याचा असा अनुभव आला. त्यातून देशभरात जो संदेश जायचा तो गेलाच.
त्यामुळे देशभरातील राजकिय लोकांचा अलिकडचा वावर पाहिल्यावर असे लक्षात येते की, सत्यवान सावित्री सारखाच सत्यवान राजकारण्यांचाही जमाना संपून चारित्र्याचा खोटाच बहाणा करणार्यांचा आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कृती आणि त्यांच्या कृतीचे समर्थन करत बाजू मांडणारी मंडळी पहिली तर या कटू सत्याची अधिक खात्री पटते.
