
धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
धुळे | प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर धुळ्याच्या हर्ष देवेंद्र ठाकूर याने ‘सीए’ (Chartered Accountant) फायनल परीक्षेत देदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, हर्षने अत्यंत कठीण मानली जाणारी ही परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पहिल्याच प्रयत्नात दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण होऊन पूर्ण केली आहे. त्याच्या या यशामुळे हर्ष धुळे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मानकरी ठरला आहे.
निकालाची टक्केवारी कमी, पण हर्षची भरारी मोठी!
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यावर्षी देशाचा दोन्ही ग्रुपचा एकत्रित निकाल केवळ १०.९७% इतका लागला आहे. परीक्षेची काठिण्यपातळी आणि निकालाचे कमी प्रमाण असतानाही, हर्षने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर या १० टक्क्यांत स्थान मिळवून ‘सीए’ ही मानाची पदवी प्राप्त केली.
कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण
हर्ष हा देवेंद्र ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांचा मुलगा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल ठाकूर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हर्षने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन आणि आपल्या कठोर मेहनतीला दिले आहे.
सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्यपूर्ण अभ्यास केला, त्यामुळेच पहिल्या प्रयत्नात हे यश मिळाले. भविष्यात आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी करण्याचा मानस आहे.
— हर्ष ठाकूर
