
भाजपच्या माजी खासदार हिना गावितांचा आरोप
नंदुरबार – नंदुरबार नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. केवळ नंदुरबारच नव्हे तर, संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला एकही नगरपरिषद आली नाही. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीपासून गावित परिवाराविरुध्द शिवसेना शिंदे गट हा सुरु असलेला वाद नगरपरिषद निवडणुकीतही कायण राहिल्याचे दिसून आले. निवडणुकीनंतर आता दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे.
हा वोट जिहाद मुळे पराभव झाल्याचा दावा माजी खासदार डॉ हीना गावितांनी केला आहे. एका विशिष्ट समुदायाची 95 टक्के मते शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळाल्याचे आकडेवारीवरुन दिसत असल्याने शिवसेना शिंदे गटाचा विजय हा वोट जिहादमुळे झाल्याच हिना गावित म्हणाल्या आहे.
नंदुरबार नगरपरिषदेत झालेल्या पराभवानंतर माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या पराभवाचे विश्लेषण केले. नगरपरिषदेच्या ऐन तोंडावर भाजपचे नेते शिरीष चौधरी आणि विक्रांत मोरे हे भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात शामील झाले . त्यामुळे नंदुरबार शहरात भाजप संपल्याची चर्चा होती. अशातच भाजपमधील एक गट शिवसेना शिंदे गटाशी युतीसाठी आग्रही असल्याचे दिसून आले. परंतु, सर्व शंका-कुशंकांना फाटा देत माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करीत शिंदे गटासमोर आव्हान निर्माण केले होते. प्रारंभी एकतर्फी वाटत असलेल्या या निवडणूकीत त्यांनी रंगत भरली होती.
नंदुरबारमधील ४१ पैकी २६ ठिकाणी नवखे उमेदवार दिले. त्यांचा शिंदे गटासमोर निभाव लागला नाही. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा झालेला पराभव आणि शिंदे गटाचा झालेला विजय हा वोट जिहादमुळे झाल्याचा दावा केला. नंदुरबारच्या प्रभाग क्रमांक १२ आणि १५ चा दाखला देत याठिकाणी नगराध्यक्षपदासाठीची सर्व मते शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळाली. नगरसेवकांची मते ही एमआयएमला मिळाल्याचे सांगितले. हा वोट जिहादचा प्रकार असल्याने काही मतांनी भाजपचा पराभव झाला. निवडणूकीच्या अवघ्या १५ दिवसात सर्वच उमेदवारांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच ३० हजारांहून अधिक मते मिळविण्यात भाजपला यश आल्याचे हिना गावित म्हणाल्या.
