
-
आमदार सुरेश भोळेंचा आरोप – महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे निधी वाया जाणार
जळगाव : शहरातील प्रसिद्ध मेहरूण तलाव सुशोभिकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी, दूषित पाण्यामुळे हा प्रकल्प धोक्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी मेहरूण तलाव परिसरात जल पर्यटन प्रकल्प राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मे महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आला आणि ७५ लाखांचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला. मात्र, तलावातील सांडपाणी व दूषित पाण्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणे अशक्य असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.
२०१७ मधील प्रयोगशाळा तपासणीत मेहरूण तलावाचे पाणी जीवजंतू व वनस्पतींसाठी घातक असल्याचे निष्पन्न झाले होते. काही महिन्यांपूर्वी हजारो मासे मृत अवस्थेत सापडल्याने तलावातील प्रदूषणाचा स्तर किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले होते.
सांडपाण्याचा थेट तलावात
बंगले, उंच इमारती व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी निचरा तलावात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा, वाढती क्षारता आणि कमी ऑक्सिजनमुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात आयुक्तांना वारंवार पत्रे देऊनही महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी नियमांचे उल्लंघन करून बंगल्यांसह उंच इमारतींना बांधकाम परवानगी देतात, त्यामुळेच आज तलाव सर्वाधिक दूषित झाल्याचे भोळे म्हणाले. “कमावणारा मुलगा सगळ्यांना गोड वाटतो, तशीच परिस्थिती महापालिकेत आहे”, असा टोला त्यांनी प्रशासनाला लगावला.
