
चेअरमन अनिल मुंदडा यांचे अध्यक्षतेखाली ६३ वी वार्षिक सभा संपन्न
धुळे : धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (घाऊक व किरकोळ) ग्राहक भांडाराची ६३ वी वार्षिक साधारण सभा चेअरमन अनिल बन्सीलाल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. ३१ ऑगस्ट २०२५) संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. सभेत संस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात १३ लाख ४२ हजारांचा व्यापारी नफा आणि २३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेचे सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
चेअरमन मुंदडा म्हणाले की, “सध्याच्या स्पर्धात्मक युगात मॉल संस्कृती आणि घरपोच सेवांच्या वाढत्या व्यवसायामुळे आव्हाने मोठी आहेत. तरीही आपले ग्राहक भांडार यशस्वीपणे सुरू आहे. वर्षभरात स्वस्त धान्य दुकानांतून ९ लाख ५२ हजार, ग्राहक बाजारातून ५ लाख ५३ हजार, तर कापड दुकानांतून ६१ हजार रुपयांची विक्री झाली आहे. निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला तब्बल २ कोटी २७ लाख १२ हजार रुपयांचा माल पुरवठा करण्यात आला.”
सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांवर चर्चा होऊन एकमताने मंजुरी देण्यात आली. या यशस्वी कामगिरीबद्दल चेअरमन मुंदडा यांनी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, उपनिबंधक मंगेशकुमार शहा, अधीक्षक वृशाली पाटील, विजय भडागे, अमोल इंडाईत, नवनित गोसावी आदींच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले. तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशन, संचालक व कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
वार्षिक सभेला व्हा. चेअरमन हिरालाल शंकरराव सापे, संचालक देविदास माळी, विजय पिंगळे, शरद देशपांडे, यतिष चौधरी, हेमंत पाटील, त्र्यंबक कापडे, शांताराम कुळकर्णी, दिनेश माळी, बद्रिविशाल व्यास, वसंत चौरे, दिना चौक, उषा काबरा आदींसह प्रभारी मॅनेजर जे. एच. देवरे, मधुकर महाजन, एल. एन. देवरे, नागराज पाटील, विक्रम थोरात, गंगाधर भडागे, मुकेश चित्ते, छाया वाघ, मंगला मोरे तसेच अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक देविदास निंबा माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
