
जळगाव : दिवाळी सण फक्त आनंदाचा नाही, तर संस्कार आणि सामाजिक मूल्यांची जाणीव देणारा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत प्रत्येक दिवशी शेतकरी, व्यापारी आणि कुटुंबीय विविध परंपरा निभावत दीपोत्सव साजरा करत असतात. दिनांक 17 नोव्हेंबरला वसूबारस आहे. या दिवसापासून उत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे.
१. वसुबारस (गोवत्स द्वादशी)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. या दिवशी गायीचे पूजन केले जाते. गोमाता ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. शेतकरी वर्ग विशेष उत्साहाने हा दिवस साजरा करतो. गायींना सजवले जाते, त्यांना अन्नधान्य, फळे, हरभऱ्याची पानं खाऊ घालतात.
संस्कार: श्रमाचा, पशुधनाचा सन्मान व गोसेवेचे महत्त्व याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे.
२. धनत्रयोदशी (धनतेरस)
त्रयोदशीच्या दिवशी ‘धन्वंतरी जयंती’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो.आरोग्याचे अधिपती भगवान धन्वंतरी यांची पूजा करतात.या दिवशी चांदी-सोनं, धातू, भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे.
संस्कार: आरोग्य, समृद्धी व आयुष्य दीर्घ व्हावे म्हणून प्रार्थना केली जाते.
३. नरक चतुर्दशी (काळा दिवस / छोटी दिवाळी)
या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला भयमुक्त केले, अशी कथा आहे.पहाटे लवकर उटणे-आंघोळ करणे, सुगंधी उटणे-तेलाने स्नान ही परंपरा आहे.शरीर-मनातील दोष धुऊन टाकण्याचे प्रतीक मानले जाते.
संस्कार: शुद्धता, आरोग्य व आनंद यांचे प्रतीक.
४. लक्ष्मीपूजन (मुख्य दिवाळी)
घराघरांत देवी लक्ष्मी, भगवान गणेश व कुबेर यांचे पूजन केले जाते. घर-कार्यालय प्रकाशाने उजळवले जाते. व्यापाऱ्यांचे खातेपूजन, कुटुंबीयांची एकत्र आरती हाच दिवाळीचा आत्मा आहे.
संस्कार: श्रम, स्वच्छता, ऐक्य व दानधर्म हाच खरा वैभव आहे.
५. दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा / व्यापारी नूतनवर्ष)
राजा बलीने प्रजेसोबत केलेल्या वचनाची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. पती-पत्नीमध्ये परस्पर सन्मानाचे प्रतीक म्हणून “औक्षण” होते.
व्यापारी वर्गासाठी हा नूतन वर्षारंभ मानला जातो.
संस्कार: नात्यातील प्रेम, परस्पर विश्वास व नवीन कार्यारंभाचा संदेश.
६. भाऊबीज (यमद्वितीया)
या दिवशी यमाने आपल्या बहिणी यमुनाजवळ जाऊन भोजन केले, अशी कथा आहे. बहिण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
संस्कार: भावंडांच्या प्रेमाची जाणीव व कुटुंबातील एकोपा वाढवणारा दिवस.
