
मराठा समाजाविषयी केलेलं वक्तव्य भोवलं
जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काढले असल्याची माहिती छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी मंगळवारी माध्यमांना दिली. ते म्हणाले की, पोलिस महासंचालकांनी बडतर्फीचे आदेश 30 सप्टेंबर 2024 रोजी काढले मात्र तीन महिन्यांपूर्वीच आदेशाची प्रत संघटनेला प्राप्त झाली आहे.
पत्रकार परिषदेला अशोक शिंदे यांच्यासह शरद पांडे, प्रकाशराव अडेलकर, मनीषा पाटील, डॉ.गणेश पाटील, आशा मौर्य, जे.बी.पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, ऑडीओ क्लीप व्हायरलनंतर बकाले दोन वर्ष सापडले नाही तर जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आल्यानंतर शासनाने त्याची दखल घेत बकालेंना बडतर्फ केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अवमानजनक भाषेची क्लीप व्हायरल
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याने आपल्या पोलिस कर्मचार्याशी फोनवर बोलताना मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबाबतची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यानंतर जळगावसह राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. जळगावातील छत्रपती शिवाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने करत किरणकुमार बकालेला बडतर्फ करण्याची मागणी केली
पोलिस महासंचालकांनी केली कारवाई
विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या चौकशीनंतर बकाले यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना समक्ष सुनावणीची संधी दिली असली तरी नवे मुद्दे मांडता न आल्याने सेवेतून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला. संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत करत हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
