
राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
नवी दिल्ली : निवडणूक आयोग वोटर डिलीट करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. कर्नाटक सीआयडीने निवडणूक आयोगाला १८ पत्रं पाठवली आहेत, मात्र त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नाही असे सांगत राहुल गांधी यांनी आपल्याला ही सर्व माहिती मिळवण्यात निवडणूक आयोगातीलच एका व्यक्तीने मदत केल्याचा दावा करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला आरोपीच्या कठड्यात उभे केले आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेत गंभीर गोंधळ झाल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने वोटर डिलीशन कशाप्रकारे केलं जातं हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे पुरावे सादर करत सांगितले. त्यांनी
पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला आहे की, आम्हाला निवडणूक आयोगातील व्यक्तींकडूनच मदत मिळायला लागली आहे. यापूर्वी असे होत नव्हते. मात्र आता निवडणूक आयोगातील आतील माणसेच आम्हाला मदत करत आहेत. हे आता थांबणार नाही. भारतातील लोकं ही वोट चोरी मान्य करणार नाहीत. ज्यावेळी युवकांना मत चोरी होत आहे हे कळेल त्यावेळी ते सर्व ताकदीनिशी विरोध करतील.
राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘प्रत्येक निवडणुकीत कोणीतरी कोणता तरी लोकांचा समुह भारतातील मतदार डिलीट करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या जातसमुहातील लोकांची विशेषकरून विरोधकांना मतदान करणाऱ्या लोकांची नावे डिलीट केली जात आहेत. यात दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा जास्त समावेश आहे. हे सर्व लोकं सहसा विरोधकांना मतदान करतात.
गांधी पुढं म्हणाले, ‘आम्ही हे खूपवेळा ऐकलं आहे. आता हा घोटाळा शंभर टक्के पुराव्यानिशी सिद्ध झाला. मी इथे उभे राहून शंभर टक्के पुरावा असल्याशिवाय बोलणार नाही. माझं माझ्या देशावर, संविधानावर आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रेम आहे. मी ही लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी शंभर टक्के पुराव्यानिशीच बोलणार नाहीतर बोलणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले
मात्र कर्नाटकात प्रयत्न झाल्याचे केले मान्य
कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन पद्धतीने हटवता येत नाही, असा दावा करत राहुल गांधी यांचे आरोप आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे आयोगाचे आयोगाने म्हटलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, हे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत आयोगाने स्वतःहून गुन्हा (FIR) दाखल केल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
राहुल गांधींनी चुकीची धारणा
निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणताही मतदार ऑनलाइन हटवला जाऊ शकत नाही, अशी चुकीची धारणा राहुल गांधी यांनी तयार केली आहे. संबंधित व्यक्तीला संधी दिल्याशिवाय कोणताही बदल किंवा नाव हटवणे शक्य नाही.
