
जळगाव : रावेर विधानसभेचे तरुण, तडफदार आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांची नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट सदस्य) म्हणून निवड करण्यात आली आहे. अधिसभेचे अध्यक्ष यांनी ही निवड जाहीर केली असून त्याबाबतचे अधिकृत पत्र आमदार जावळे यांना प्राप्त झाले आहे. आमदारांच्या कोट्यातून झालेल्या या निवडीचे उत्तर महाराष्ट्रभर स्वागत होत आहे.
अमोल जावळे हे माजी आमदार स्व. हरीभाऊ जावळे यांचे सुपुत्र असून त्यांनी वडिलांचे प्रामाणिकपणा, व्यासंग आणि लोकसंपर्काची परंपरा जपली आहे. उच्चशिक्षित आणि अभ्यासू स्वभावाचे अमोल जावळे राजकारणात सक्रिय होताच, मतदारसंघातील समस्यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण, सिंचन आदी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गावोगाव, पाड्यापाड्यांवर जाऊन लोकांना भेटण्याचा त्यांचा सरळ व सहज स्वभाव मतदारांच्या मनात घर करून गेला. यामुळे अल्पावधीतच ते मतदारसंघात लोकप्रिय झाले असून, भाजपामधील एक भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
महत्वाच्या नेत्यांचा विश्वास
अमोल जावळे हे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांची काम करण्याची तडफ, संयमित पण ठाम भूमिका आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे त्यांना “अजातशत्रू नेता” म्हणून लोक ओळखतात.
विद्यापीठाच्या प्रगतीसाठी अपेक्षा
विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणे, सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणे आदी अनुषंगिक कामे करण्यासाठी ते कटिबद्ध राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा गौरव
अमोल जावळे यांच्या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वाला बळ मिळाले आहे. शैक्षणिक क्षेत्र आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांना एकत्रित जोडणारी ही निवड ठरणार असून, त्यामुळे विद्यापीठाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
