
आमदार अमोल जावळेंच्या रुपात विद्यापीठाला मिळाले पाठबळ
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नुकतीच रावेरचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांची सिनेट सदस्य म्हणून झालेली निवड ही केवळ एक औपचारिक घटना नाही. ही निवड उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींना नवी दिशा देणारी ठरू शकते.
विद्यापीठ म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि पदव्या देणारी संस्था नसते, तर ती एखाद्या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचा केंद्रबिंदू असते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ गेल्या काही वर्षांत संशोधन, शैक्षणिक कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, पायाभूत सुविधा, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि जागतिक दर्जा या दृष्टीने अजून मोठी उडी घेणे बाकी आहे.
अशा वेळी राज्याच्या सत्ताकेंद्राशी जवळीक असलेले आमदार सिनेटवर असणे ही मोठी संधी आहे. अमोल जावळे यांची निवड या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.
तरुणाईचे प्रतिनिधित्व
अमोल जावळे हे दिवंगत आमदार स्व. हरीभाऊ जावळे यांचे सुपुत्र. वडिलांचा प्रामाणिकपणा, सर्वसमावेशक दृष्टी आणि विकासाभिमुख राजकारण हे गुण त्यांनी वारशाने घेतले. परंतु फक्त वारसा पुरेसा ठरत नाही, तरुणाईच्या अपेक्षा, मतदारसंघातील कठीण प्रश्न आणि पक्षीय राजकारणाचा दबाव सांभाळत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
रस्ते, आरोग्य, सिंचन आणि शिक्षण या चार महत्वाच्या विषयांवर त्यांनी विधायक कामे केली. गावोगाव पायी जाऊन लोकांच्या अडचणी ऐकण्याची त्यांची पद्धत ही आजच्या काळातील “नेतृत्वाची खरी शाळा” मानली जाऊ शकते. त्यामुळेच अल्पावधीत त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे.
राजकीय पातळीवरील स्थान
अमोल जावळे हे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून भाजपमध्ये वेगळे स्थान मिळवून आहेत. पक्षात त्यांच्याकडे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. महत्वाचे म्हणजे ते “अजातशत्रू” म्हणून ओळखले जातात. विरोधकांनाही सामावून घेण्याची आणि मतभेद असूनही संवाद ठेवण्याची कला त्यांच्या स्वभावात आहे. हा गुण राजकीय संघर्षाच्या काळात फार उपयोगी पडतो.
शैक्षणिक विकासाचे आव्हान आणि अपेक्षा
विद्यापीठ अधिसभेवरील सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर आमदार जावळे यांच्यापुढे नक्कीच काही आव्हनेही असतील तसेच विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम सुरू करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल तंत्रज्ञान, संशोधन केंद्रे, आंतरराष्ट्रीय सहकार्य कार्यक्रम यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, उत्तर महाराष्ट्राला उच्च शिक्षणात नवा दर्जा मिळवून देणे, राजकीय पाठबळामुळे निधी, धोरणात्मक निर्णय आणि नवे प्रकल्प आणण्यास मदत होईल, अशा अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.
एक नवा अध्याय
उत्तर महाराष्ट्राला आतापर्यंत राजकीय नेतृत्वाची परंपरा आहे, मात्र शैक्षणिक नेतृत्वाची कमतरता नेहमी जाणवत आली आहे. आमदार अमोल जावळे यांची निवड ही त्या दरीला भरून काढणारी ठरू शकते. तरुणाईच्या आकांक्षा, विद्यापीठाच्या गरजा आणि प्रदेशाच्या विकासाचे स्वप्न या तिन्ही गोष्टी एकत्र आणण्याची क्षमता या निवडीत आहे.
अमोल जावळे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयम, तडफ आणि समावेशक दृष्टी यांचे मिश्रण आहे. विद्यापीठ अधिसभेवरील त्यांची उपस्थिती ही केवळ राजकीय दर्जा वाढवणारी बाब नाही, तर शैक्षणिक प्रगतीसाठी नवा अध्याय सुरू करणारी ठरू शकते. आता त्यांच्या कामकाजातूनच हे सिद्ध होईल की त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाला कितपत नवे उंचीवर नेले.
-
- त्र्यंबक कापडे
संपादक, दैनिक जनशक्ती, Next महाराष्ट्र
- त्र्यंबक कापडे
